CBSE Result : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) दहावीच्या पहिल्या बोर्ड परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर केला. यंदा एकूण 93.70 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सुमारे 24.71 लाख विद्यार्थ्यांपैकी 23.16 लाख विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. नव्याने लागू करण्यात आलेल्या ‘दोन बोर्ड परीक्षा’ धोरणाच्या पार्श्वभूमीवर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

निकालात मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का 94.99 टक्के असून, मुलांच्या 92.60 टक्क्यांच्या तुलनेत अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात 0.04 टक्क्यांची वाढ झाली आहे. गुणवत्तेच्या शर्यतीला आळा घालण्यासाठी अव्वल विद्यार्थ्यांची यादी जाहीर न करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2.21 लाखांहून अधिक असून, 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांची संख्या 55 हजारांपेक्षा अधिक आहे. विशेष गरजांच्या विद्यार्थ्यांचा निकाल 96.24 टक्के नोंदवला गेला आहे.
शाळानिहाय निकालात केंद्रीय विद्यालयांचा निकाल 99.57 टक्के, जवाहर नवोदय विद्यालयांचा 99.42 टक्के आहे. खासगी शाळांचा निकाल 93.77 टक्के, सरकारी शाळांचा 91.43 टक्के आणि अनुदानित शाळांचा 91.01 टक्के इतका लागला आहे. परदेशातील CBSE शाळांचा निकाल 99.10 टक्के नोंदवला गेला आहे.
विभागनिहाय निकालात तिरुअनंतपुरम आणि विजयवाडा विभागांनी 99.79 टक्के निकालासह अव्वल स्थान मिळवले आहे. चेन्नई विभागाचा निकाल 99.58 टक्के, दिल्ली पश्चिम विभागाचा 97.45 टक्के आणि दिल्ली पूर्व विभागाचा 97.33 टक्के आहे. Pune विभाग 96.66 टक्के निकालासह सातव्या स्थानावर आहे. गुवाहाटी विभागाचा निकाल 85.32 टक्के इतका नोंदवला गेला आहे.
पुणे विभागात एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी उच्च टक्केवारी मिळवली आहे. मुर्तजा रावत (99.8%), निहार लोहाडे (99.4%) आणि ऋषभ कोरलाहल्ली (99.2%) यांनी उल्लेखनीय गुण मिळवले आहेत. अनेक शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून, मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्क्यांदरम्यान गुण मिळवले आहेत.







