Pune Crime : हडपसर, ता. 16 : पुण्यातील हडपसर परिसरात एका विवाहित महिलेला सासरच्या मंडळींकडून सातत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी तब्बल 5 लाख रुपयांची मागणी, मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे त्रस्त झालेल्या महिलेने अखेर हडपसर पोलिसांत धाव घेतली असून 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती सचिन बंसीदाप्पा कोनाळे, सासू शामल बंसीदाप्पा कोनाळे, सासरे बंदीदाप्पा गुराप्पा कोनाळे, दीर गुराप्पा बंसीदाप्पा कोनाळे, जाऊ पूजा गुराप्पा कोनाळे (रा. तुळजापूर, जि. धाराशिव) व करबसप्पा कारंडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका 27 वर्षीय विवाहितेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि सचिन बंसीदाप्पा कोनाळे यांचा विवाह 9 एप्रिल 2017 रोजी हिंदू पद्धतीने झाला आहे. सुरुवातीला काही दिवस संसार सुरळीत सुरू होता; मात्र त्यानंतर सासरच्या मंडळींकडून छळाला सुरुवात झाली. लग्नात अपेक्षित वस्तू व हुंडा मिळाला नाही, या कारणावरून सासू, सासरे, दीर व जाऊ यांनी वारंवार टोमणे मारत मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. “माहेरून 5 लाख रुपये घेऊन ये” असा तगादा लावण्यात येत होता. मात्र, वडील नसल्याने ही मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर छळ अधिकच वाढल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याशिवाय, “तुला मूल होत नाही” असे म्हणत अपमानास्पद शब्द वापरून हिनवणे, वारंवार मारहाण करणे, शिवीगाळ करणे असे प्रकारही सुरूच होते. पती सचिन कोनाळे यांना दारूचे व्यसन असून, दारूच्या नशेत त्यांनी पत्नीला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. वाहन चालवताना धोकादायक पद्धतीने गाडी चालवत “मोठ्या गाडीखाली घालीन” अशी भीती दाखवली जात होती. तसेच, “माझ्याकडे मानसिक आजाराचे प्रमाणपत्र आहे, मला काही होणार नाही” असे सांगत पतीकडून वारंवार धमकावले जात होते.
दरम्यान, या सततच्या छळाला कंटाळून संबंधित महिला 2024 साली माहेरी निघून गेली. त्यानंतर सासरच्या मंडळींकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचेही समोर आले आहे. या सर्व प्रकारांमुळे त्रस्त झालेल्या महिलेने अखेर हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पती, सासू, सासरे, दीर व जाऊ यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम 115(2), 351(2), 352, 85 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.







