मुंबई: ठाणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा एकदा (Mumbai Bribe News)कारवाई करत दोन सरकारी अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले आहे. ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागणाऱ्या वन विभागातील अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात विलास सानप आणि रेखा गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला नवीन पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी वन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. यासाठी अर्ज केल्यानंतर विलास सानप यांनी 50,000 रुपयांची लाच मागितली. मात्र तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीनंतर ACBने तातडीने सापळा रचला. तक्रारदार आणि आरोपींमध्ये झालेल्या चर्चेनंतर 25,000 रुपयांवर व्यवहार ठरला. बुधवारी तक्रारदार पैसे देण्यासाठी संबंधित कार्यालयात गेले असता ACBचे अधिकारी आधीच सापळा लावून बसले होते. त्यावेळी विलास सानप आणि रेखा गायकवाड यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
या कारवाईमुळे पुन्हा एकदा सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार समोर आला आहे. गेल्या काही महिन्यांत अशा अनेक कारवाया होत असूनही लाच मागण्याचे प्रकार थांबलेले नाहीत. नागरिकांना आपल्या हक्काच्या कामासाठी अजूनही पैसे मोजावे लागत असल्याचे चित्र आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यातही नुकतीच अशाच प्रकारे दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे राज्यभरात ACBकडून भ्रष्टाचाराविरोधात कारवाई सुरू असल्याचे दिसून येत आहे.







