Pune : शहरातील जुन्या इमारतींच्या पाडकामादरम्यान होणारे अपघात आणि शेजारील रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकाने नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमांनुसार पाडकाम करण्यापूर्वी विविध परवानग्या आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना अनिवार्य करण्यात आल्या आहेत.
महापालिकेने जाहीर केलेल्या नियमांनुसार, इमारत पाडण्यापूर्वी संबंधित विभागाची लेखी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. पाडकाम करणाऱ्या सोसायटी किंवा विकासकांनी शेजारील इमारतींचे पदाधिकारी, स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि महावितरण अधिकाऱ्यांचे संपर्क तपशील उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे. तसेच ‘प्रॉपर्टी टॅक्स’ आणि ‘पाणीपुरवठा’ विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) घेणेही अनिवार्य करण्यात आले आहे.
पाडकामामुळे शेजारील इमारतींना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास त्या इमारती रिकाम्या करण्याची जबाबदारी संबंधित विकासक आणि सोसायटीवर टाकण्यात आली आहे. पाडकामाची संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शक राहावी यासाठी महापालिकेकडून देखरेख ठेवली जाणार आहे.
पुण्यात पुनर्विकासाच्या कामांदरम्यान शेजारील इमारतींना तडे जाणे किंवा अपघात होण्याच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही नियमावली लागू करण्यात आली आहे.







