Pune News पुणे, ता. 14 : येरवडा खुल्या कारागृहातून आणखी एका कैद्याने पलायन केल्याची गंभीर घटना समोर आली असून कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी सुरक्षा यंत्रणेची नजर चुकवून फरार झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. Pune News

जनार्दन शंकर अडसुळे (रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी सुभेदार चंद्रकांत सयाजी खांदवे (वय ५८) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी दुपारी दोन ते चारच्या दरम्यान ही घटना घडल्याचे समोर आले आहे. Pune News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनार्दन अडसुळे याच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. २०१७ मध्ये घडलेल्या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. शिक्षा भोगत असताना त्याला येरवडा खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र मंगळवारी त्याने सुरक्षा रक्षक आणि तुरुंग कर्मचाऱ्यांची नजर चुकवत कारागृहातून पलायन केले. काही वेळानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बुधवारी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. Pune News
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच सातारा जिल्ह्यातील संतोष लक्ष्मण भिंगारे हा जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी येरवडा खुल्या कारागृहातून फरार झाला होता. कारागृह परिसरातील शेतीत मोबाईल सापडल्यानंतर होणाऱ्या चौकशीच्या भीतीने त्याने पलायन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.
संतोष भिंगारे (मूळ रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) हा ८ मे रोजी दुपारी दीड ते सायंकाळी सहाच्या दरम्यान कारागृहातून पळून गेला होता. याप्रकरणी तुरुंगाधिकारी नागनाथ महादेव भानवसे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. सलग दोन कैदी फरार झाल्याने येरवडा कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांकडून दोन्ही कैद्यांचा शोध सुरू आहे.







