पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात फ्लॅट विक्रीच्या नावाखाली मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 45 वर्षीय महिलेने तब्बल 60 लाख रुपये देऊन फ्लॅटचा ताबा घेतला होता. मात्र त्याच फ्लॅटची दुसऱ्याला विक्री करून दोन बँकांकडून कर्ज घेतल्याचे उघड झाले आहे.

या प्रकरणी निलेश प्रभाकर कामठे, दीपमाला काळे आणि चंद्रकांत संगणाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मे 2015 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे पती परदेशात नोकरीला असून त्या पुण्यात दोन मुलांसह राहत आहेत. कोंढव्यातील निर्माण इस्ट्रेला प्रकल्पात त्यांनी 832 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट खरेदी करण्याचे ठरवले. वेळोवेळी 60 लाख रुपये दिल्यानंतर जून 2023 मध्ये बिल्डरने फ्लॅटची चावी दिली. मात्र रेरा नंबर लॅप्स झाल्याचे कारण देत खरेदीखत केले गेले नाही.
महिला फ्लॅटमध्ये राहायला गेल्यानंतर काही दिवसांतच आयसीआयसीआय बँकेचे कर्मचारी आले आणि फ्लॅट तारण ठेवून कर्ज घेतल्याचे सांगत रिकामा करण्याची नोटीस दिली. त्यानंतर नागपूर येथील धरमपेठ बँकेकडूनही कर्ज थकवल्याची नोटीस देण्यात आली.
बिल्डरने आर्थिक अडचणीचे कारण देत कर्ज फेडण्याचे आणि खरेदीखत करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र ते पूर्ण केले नाही. महिलेचे पती परदेशात असल्याचा फायदा घेत तिची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास नवनाथ जगताप करत असून पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.






