सोमाटणे (पुणे): सध्या सोमाटणे आणि परिसरात सर्वच व्यवसाय तेजीत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण या परिसरात वाढणारी मानवी वस्ती लक्षणीय आहे. बाहेरील राज्यातून येणारे कामगार या परिसरात मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. त्यामुळे अगदी किराणा मालापासुन ते भाजीपाला व्यवसायापर्यंत सर्वच व्यवसाय मोठ्या तेजीत असल्याचे दिसत आहे. परंतु, दिवसभर व्यवसाय करून संध्याकाळी गल्ल्यात हजार रुपयेसुद्धा रोख नसतात, ही परिस्थिती या परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी बोलून दाखवली.

या भागात सर्वच दुकानदारांचा धंदा चांगला आहे. परंतु, गल्ल्यात रोख पैशाची फार कमतरता आहे. कारण प्रत्येक जण पैसे ऑनलाईन देवू लागला आहे. त्यामुळे दिवसभर १० हजाराच्या घरात व्यवसाय असला, तरी गल्ल्यात रोकड मात्र काही शेकड्यातसुद्धा नसते. त्यामुळे पाचशे रुपये सुट्टे देताना दुकानदाराला दोन ते तीन दुकाने फिरावे लागत आहेत. याविषयी अधिक माहिती अशी की, सध्या सोमाटणे फाटा म्हणजे पवन मावळातील बाजारपेठेचे मुख्य ठिकाण झाले आहे. सोमाटणे, शिरगाव, सांगवडे, परंदवडी दारुंब्रे, साळुंब्रे, गोडूंब्रे, सांगवडे आदी भागातील शेतकरी, नोकरदार लोक खरेदीसाठी सोमाटणे फाट्याला पसंती देतात.
परंतु, ग्रामीण भाग असूनही प्रत्येकजण आपली खरेदी रोख स्वरूपात न करता थेट ऑनलाईन करत आहे. त्यामुळे दिवसभरात धंदा जरी चांगला झाला, तरी दुकानदाराकडे रोख पैसे सापडणे कठीण झाले आहे. शहरी भागात ऑनलाईन व्यवहार करणे समजण्यासारखे आहे. परंतु, आता हे लोन अगदी ग्रामीण भागातही पसरले असल्याचे दिसते आहे. ही बाब व्यवहाराच्या आणि विकासाच्या दृष्टीने जरी चांगली असली, तरी बाजारात जर रोख रक्कम नसेल तर लहान व्यवहार झाल्यावर सुट्टे पैसे कसे द्यायचे हा प्रश्न स्थानिक व्यावसायिकांना रोज सतावतो आहे. त्यामुळे या परिसरात काही एजंट निर्माण झाले आहेत, ते सुट्टे पैसे काही प्रमाणात टक्केवारी घेवून पुरवत आहेत, अशी माहिती काहींनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितली.

दिवसभर पाणीपुरी विकून गल्ल्यात पाचशेच्या वरती रोख पैसे नसतात. सर्वच जण आता ऑनलाईन पेमेंट करतात. त्यामुळे कधी कधी सुट्टे पैसे नसल्याने ग्राहक वाद घालतात.
– सोहेल, पाणीपुरी विक्रेतेगेले वर्षभरापासून रोकड येणे फारच कमी झाले आहे. दिवसभर व्यवसाय चांगला जरी असला, तरी सर्वच पैसे बँकेत जातात, त्यामुळे सुट्टे पैसे नसल्याने कधी कधी ग्राहकाला परत पाठवावे लागते. रोकड नसल्याने प्रश्न उद्भवतात.
– बदल शर्मा, दुध विक्रेते







