पुणे : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यभरात १९ ते २७ फेब्रुवारीपर्यंत ‘स्वराज्य सप्ताहा’ चे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिली..’राज्य रयतेचे जिजाऊंच्या शिवबाचे’ ही टॅगलाईन वापरत शिवजयंती, संत गाडगेबाबा जयंती, मराठी भाषा दिन अशा महत्त्वाच्या तिथींचा सुयोग्य संगम साधून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

शिवजयंतीच्या निमित्ताने ‘स्वराज्य सप्ताह’ साजरा करणे व महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान यांच्याशी आपला पक्ष जोडलेला आहे, हे जनतेसमोर मांडणे यासाठी पक्षाकडून आठवडाभर शिवराय केंद्रीत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या रयतेचे राज्य व त्यामधील संकल्पना लोकांसमोर मांडणे आणि राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हा शिवरायांच्या रयतेचे राज्य या संकल्पनेतून शासन चालवण्याची प्रेरणा घेतो हा उद्देश लोकांसमोर ठेवण्यात येणार आहे.
१९ फेब्रुवारी रोजी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिवाजी पार्क दादर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक चेंबुर दरम्यान भव्य शिव शोभायात्रा व बाईक रॅली काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेची सुरुवात सायंकाळी ४ वाजता सुरू होणार आहे. तर सांगता चेंबुर येथे आमदार सना मलिक स्वागत करुन पार पडणार आहे. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक, आमदार सना मलिक उपस्थित राहणार आहेत.








