उरुळी कांचन, (पुणे) : पूर्व हवेलीतील बिवरी ते कोरेगाव मूळ रस्त्यावरील वन खाते कुरणामधील 2 विद्युत रोहित्र अज्ञात चोरट्यांनी फोडून, रोहित्रांच्या आतील सुमारे 95 हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (ता. 18) मध्यरात्री ही घटना घडली आहे.
याप्रकरणी स्वप्निल जालींदर गायकवाड (वय – 28, व्यवसाय नोकरी रा. जय मल्हार रोड, मुकिंदा हाइटस, उरुळी कांचन ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल गायकवाड हे उरुळी कांचन महावितरण शाखा नं. 2 येथे विदयुत सहायक म्हणुन काम करतात. बुधवारी सहकारी गणेश धुमाळ व स्वप्निल गायकवाड हे उरुळी कांचन येथील कार्यालयामध्ये असताना मला बिवरी येथील सागर गोते यांनी फोन करून कळविले की, बिवरी ते कोरेगाव रस्त्यावरील वन खाते कुरणामधील दोन ट्रान्सफॉर्मर खाली पडलेले आहेत. त्यामधील ऑईल खाली सांडलेले असुन त्यामधील तांब्याच्या तारा चोरी झाल्याच्या दिसून येत आहेत.
सदर ठिकाणी गायकवाड, सागर गोते व सहा अभियंता रमेश वायकर यांचेसह जावुन पाहणी केली असता दोन रोहीत्र हे पोलवरील डिओ कट करुन खाली पडल्याचे दिसले. त्यामधील ऑईल जमिनीवर सांडवुन नुकसान करुन त्यामधील तांब्याच्या तारा चोरुन नेलेल्या दिसल्याने तांत्रिक पंचनामा केला.
दरम्यान, शुक्रवारी (ता. 20) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गणेश धुमाळ यांना अष्टापुर येथील शेतकरी सुमित कोतवाल यांनी फोन करुन कळविले की, खोल शेतवस्ती येथील दिनेश कोतवाल यांच्या शेतजमिन गट नं 49 मधील ट्रान्सफॉर्मर खाली पडलेले दिसून आले. तसेच त्यामधील तांब्याच्या तारा चोरुन नेल्याचे दिसून आले. सहा अभियंता रमेश वायकर यांनी आमचे कंपनीचे वरीष्ठ अधिका-याशी चर्चा करुन लोणीकंद पोलीस ठाण्यात 95 हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा चोरी गेल्याची कायदेशीर तक्रार दिली आहे. तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
पूर्व हवेलीत रोहित्र व केबल चोरांचा सुळसुळाट…
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचन व लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरटे गॅस कटर व ग्राइंडरचा वापर करून वेल्डिंग केलेले रोहित्र खांबांवरून खाली पाडतात आणि त्यामधील तांब्याच्या तारा आणि ऑईल काढून घेत आहेत. चोरलेल्या साहित्याच्या वाहतुकीसाठी चारचाकी वाहने वापरली जातात. महावितरणच्या वतीने या चोऱ्यांप्रकरणी रीतसर तक्रारी नोंदविण्यात आलेल्या आहेत. तसेच नदीच्या किनारी असणाऱ्या विद्युत मोटारीच्या केबल्स ही चोरी गेल्याच्या घटना आहेत. परंतु एक औपचारिकता म्हणून तक्रार दाखल करून घेण्यापलीकडे पोलिसांकडून काहीही केले जात नाही. चोरीचा तपास पोलिसांनी लावून हे सर्व चोरीचे रॉकेट उघडकीस आणावे अशी मागणी जोर धरु लागली आहे.