लोणी काळभोर : विद्युत रोहित्र फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना घडली. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जाचक वस्ती परिसरात बुधवारी (ता.21) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कवडीगावाच्या जवळून मुळामुठा नदी वाहते. त्या परिसरातील जाचकवस्तीजवळ महावितरणाचे एक रोहित्र होते. या विद्युत रोहीत्रापासून शेतीला पाणीपुरवठा होतो. दरम्यान, बुधवारी (ता.21) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी रोहित्र फोडले. त्यामधून ३७० किलो तांब्याच्या तारा चोरून नेऊन महावितरणाचे २ लाख रुपयांचे नुकसान केले आहे.
दरम्यान, पूर्व हवेलीतील मागील काही महिन्यांपासून रोहित्रांच्या आतील तांब्याच्या तारा चोरून नेल्याचे प्रमाण वाढत आहे. त्यातच बुधवारी (ता.21) कदमवाकवस्ती येथील रोहित्रांमधील तारा चोरून नेल्या आहेत. रोहित्रांच्या चोरीच्या प्रकरणांमुळे महावितरण कर्मचारी हतबल झाले आहेत.
याप्रकरणी तक्रार देण्यासाठी महावितरणाचे तंत्रज्ञ अक्षय राजाराम पाटील (वय २९, रा. वाकवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) हे तातडीने पोलीस ठाण्यात गेले. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.