पुणे : दोन दिवस झाले मुसळधार पावसाने पुण्यात धुमाकूळ घातला. अनेक भागात पाणी साचलं आहे. पावसात कित्येक भागात नागरिक अडकून होते. काल अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. परंतु, आज पुण्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. दरम्यान खडकवासला धरणातून विसर्ग कमी झाल्याने पूरस्थिती ओसरत आहे. अनेक भागांमध्ये साचलेलं पाणी ओसरलं असलं तरी मात्र या पुरामुळे पुणेकरांचं प्रचंड नुकसान झालं. पुण्यातील ज्या भागात काल पाणी साचून नुकसान झाले आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडून काल निर्माण झालेल्या पुरस्थितीचा आढावा घेतला आहे. ज्या एकता नगर, पाटील इस्टेट, सिंहगड रोड परिसरातील बाधित वस्तीत असलेला चिखल आणि कचरा ताबडतोब हटवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कामगार कमी असतील तर आउट सोर्स करून कामगार आणा. मात्र, तातडीने तो चिखल साफ करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
मुरलीधर मोहोळांकडून यंत्रणांची चूक मान्य..
खडकवासला धरणातून अचानकपणे विसर्ग वाढवण्यात आला. त्यानंतर नदीपात्रातील पाणी वाढलं त्याचा फटका अनेक सोसायट्या, घरे आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसला. पाण्याचा विसर्ग वाढवल्याची पुर्वकल्पना दिली गेली नव्हती. याबाबत खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले, मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार होता. तर त्याची पुर्वकल्पना देणं फार महत्त्वाचं होतं. हा समन्वयाचा अभाव आहे. निश्चितच आम्ही त्याच्या खोलापर्यंत जाणार आहोत. यामध्ये कोणाची चूक असेल त्याला आम्ही सोडणार नाही, असंही ते म्हणाले.
खडकवासला धरणातून विसर्ग घटवला..
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा करण्यात कमी आला आहे. खडकवासला धरणातून आता केवळ 13000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. 31 हजार क्यूसेकवरून पाण्याचा विसर्ग कमी करत तो केवळ 13 हजार क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे आता पूरस्थिती नियंत्रणात येत आहे.