पुणे : पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. 50 लाख रुपये घेऊन ज्यादा फायदा करुन देतो, असे आमिष दाखवून फसवणूक झाल्याने व्यापार्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी रमजान यांच्या राहत्या घरात घडली आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
रमजान साचे (वय-४४, रा. अंगारशहा टकीया, भवानी पेठ) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यापार्याचे नाव आहे. सुनिल बेले, अफरसर शेख, मतीन शेख, हैदर शेख, असिफ, मुजम्मिल पटवेकर आणि संजीव बजारमठ अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमजान साचे हे कपड्यांचे व्यापारी होते. त्यांची पत्नी ही शाळेत शिक्षिका आहे. रमजान यांना तुम्हाला जास्त फायदा करुन देतो. असे सांगून आरोपींने त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले आहे. तब्बल ५० लाख रुपयांहून अधिकची रक्कम आरोपींनी व्यापाऱ्याकडून घेतली आहे. त्यासाठी त्यांनी बँकेचे कर्ज देखील घेतले होते. मात्र, जेव्हा त्यांनी आरोपींकडे पैसे परत मागितले. तेव्हा आरोपींनी त्याना पैसे परत देण्यास नकार दिला.
दरम्यान, हा मानसिक त्रास सहन न झाल्याने त्यांनी सोमवारी रमजान यांनी राहत्या घरात लोखंडी अँगलला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर करीत आहेत.