लोणी काळभोर, ता. 22 : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धावत्या आरामदायी बसला लाग लागून बस जळून खाक झाल्याची घटना घडली होती. मागील आठ महिन्यांपासून ही बस कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या पुलावर बेवारसरीत्या उभी आहे. या बसकडे प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केल्याने या बसच्या आडोश्याला अथवा बसमध्ये गैरकृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इलेवन हॉटेलच्या समोर धावत्या बसचा टायर फुटून आग लागल्याची घटना घडली होती. ही घटना 9 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. चालकाच्या निदर्शनास येताच बस रस्त्याच्या एका बाजूला उभी केली. चालकाने प्रसंगावधान दाखवून त्वरित बसमधील 17 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली.अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. बसची आग विझविल्यानंतर या बसला कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या पुलावर ठेवण्यात आले होते.

दरम्यान, मागील आठ महिन्यांपासून ही बस त्याच जागेवर उभी आहे. भविष्यात या बसचा फायदा घेऊन स्वारगेट बस अत्याचार प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच बसमुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे प्रशासने याची दखल घेऊन त्वरित ही बस हटवावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.








