पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या तालावर नृत्यांगनांकडून अश्लील हावभाव, अंगविक्षेप व बीभत्स नृत्य केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन नृत्यांगना, डीजे मालक आणि गणेश मंडळाच्या तीन कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

कोऱ्हाळे बुद्रुक येथील माळशिकारेवाडी परिसरात बुधवारी (ता. 23) रात्री सव्वानऊच्या सुमारास हा प्रकार घडला. राधा संग्राम घुले, मीनाक्षी बापुराव रुपनवर, काजल नितीन शिंदे (तिघी रा. लाकडी, ता. इंदापूर), डीजे मालक रोहित हणमंत धुमाळ (रा. गोखळी, ता. फलटण) तसेच श्री साई समर्थ तरुण मंडळाचे कार्यकर्ते राहुल दिलीप माळशिकारे, दीपक सुभाष माळशिकारे आणि निखील जालिंदर माळशिकारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री साई समर्थ तरुण मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीमध्ये डॉल्बी संगीत सुरू होते. त्यावर नृत्यांगनांकडून अश्लील हावभाव व अंगविक्षेप करत नृत्य सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

मिरवणुकीदरम्यान अशा प्रकारे नृत्य सुरू असताना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधितांकडून त्यास प्रोत्साहन दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मिरवणुकीसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस करीत आहेत.







