लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी (ता. १९) महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे तीन एकरांतील उभा ऊस शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत जळाल्याची घटना घडली आहे. जळालेल्या ऊस पिकाची भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे.
शुक्रवारी (ता. १९) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. रामभाऊ तुकाराम कुंजीर (ता. थेऊर, ता. हवेली) असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेत कुंजीर यांचे सुमारे साडेचार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामभाऊ कुंजीर यांची वृंदावन मंगल कार्यालयाच्या बाजूला शेती आहे. शेतातील ऊस गाळप आणि तोडणीच्या अंतिम टप्प्याच्या प्रतिक्षेत उभा होता. या शेतीतून महावितरणची वीजवाहक तारा गेल्या आहेत. त्यातील दोन तारा या तुटून उसात पडल्या होत्या.
दरम्यान, तुटलेल्या तारांमधून शॉर्टसर्किट होऊन ऊसाला आग लागली असल्याचा आरोप कुंजीर यांनी केला आहे. महावितरणचे कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट देऊन महिती घेतली आहे. शेतातील ३ एकर ऊस जळून आर्थिक नुकसान झाल्याने महावितरणने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी कुंजीर यांनी केली आहे.