उरुळी कांचन, (पुणे) : घरातील सर्वजण शेतीकामासाठी बाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घरात प्रवेश करून तब्बल सव्वा दहा लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (ता. 15) सकाळी 10 ते दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बोरीबेल, गाडेवाडी (ता. दौंड) गावचे हद्दीत हि घटना घडली आहे.
याप्रकरणी सुमन दादा जेडगे (वय 67, व्यवसाय शेती रा. गाडेवाडी, बोरीबेल ता. दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमन जेडगे व त्यांचे कुटुंबीय शेतीकामासाठी बाहेर गेले होते. दुपारी घरी आले असता त्यांना घराचे कडी कोयंडा व कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. घराचा दरवाजा उघडून पाहिला असता, घरातील सर्व कपाटे उघडे होती व त्यातील कपडे अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले.
दरम्यान, यावेळी त्यांनी मुलाला बोलावून घेऊन घराची पाहणी केली असता कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा 10 लाख 37 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे निदर्शानास आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उगले करीत आहेत.