पुणे : पुणे शहर आणि परिसरात किरकोळ वादातून मारहाण, खून करण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. सिंहगड रस्ता भागात वडगाव परिसरात डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करुन हॉटेलमधील वेटरचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. सुनीलकुमारच्या खुनामागील निश्चित कारण अद्याप समजू शकले नाही. प्राथमिक चौकशीत वादातून खून झाल्याची माहिती मिळत आहे.
सुनीलकुमार राम आसरे (वय २५, रा. चमका बनी, हरदोई, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या वेटरचे नाव आहे. याबाबत सुशीलकुमार (वय २५, रा. गंगाई हाईट्स, आंबेगाव बुद्रुक) याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीलकुमार आणि सुशीलकुमार हे दोघे नातेवाईक आहेत. दोघे जण आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला आहेत. वडगाव बुद्रुक परिसरात दांगट शाळेजवळील मोकळ्या जागेत सुनीलकुमार मृतावस्थेत पडलेला आढळला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी केलेल्या चौकशीत सुनीलकुमारच्या डोक्यात कठीण वस्तूने प्रहार करुन खून केल्याचे उघडकीस आले. खुनामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणातील फरार आरोपींचा माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक दीपक कादबाने अधिक तपास करत आहेत.