उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्यावर सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव १० विरुद्ध ३ च्या फरकाने मंजूर झाला आहे. त्यामुळे आता विठ्ठल शितोळे यांची सरपंचपदावरुन पायउतार झाली आहे.
कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्या विरोधात १३ पैकी १० ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानुषंगाने हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २१) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कोरेगाव मूळ ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.
तहसीलदार किरण सुरवसे यांनी सदस्यांची मते विश्वासात घेऊन, विश्वास ठरावावरील मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीने घेतली. या मतदानात प्रक्रियेत अविश्वास ठरावाच्या बाजूने १० व विरोधात ३ मते पडली. त्यानंतर तहसिलदार किरण सुरवसे यांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. यावेळी उरुळी कांचन मंडलाअधिकारी नूरजहाँ सय्यद यांनी शासकीय कामकाज पहिले.
यावेळी उपसरपंच वैशाली अमित सावंत, ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब यशवंत बोधे, भानुदास खंडेराव जेधे, मंगेश अशोक कानकाटे, सचिन गुलाब निकाळजे, लिलावती बोधे, बापूसाहेब बोधे, अश्विनी चिंतामणी कड, राधिका संतोष काकडे, मंगल जगन्नाथ पवार, पल्लवी रमेश नाजीरकर, दत्तात्रय ज्ञानेश्वर काकडे, मनिषा नंदकिशोर कड यांनी अविश्वास ठरवाला मतदान केले. यावेळी परिसरात पोलिस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांच्या नेतृत्वात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, सरपंच विठ्ठल शितोळे हे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता निर्णय घेणे, तसेच बहुमताने घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणे, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीचे कामकाज करणे, सदस्यांना अपमानास्पद वागणूक देणे, मनमानी पद्धतीने ग्रामपंचायतिचे कामकाज करणे, सरपंच ग्रामपंचायत सदस्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत. त्यामुळे १० सदस्यांनी हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होते.