लोणी काळभोर, ता. 11 : वेळ दुपारी बाराची… तरडे (ता. हवेली) येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या एका टँकरला आज मंगळवारी (ता.11) आग लागते… पाहता पाहता धुराचे मोठ-मोठाले लोळ दूरवर पसरतात…बीपीसीएल कंपनीची धोक्याची घंटा वाजविली जाते… कर्मचाऱ्यांची धावपळ सुरु होते…त्यानंतर या घटनेची माहिती पोलीस प्रशासन, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, आरोग्य सेवा यांना ताबडतोब देण्यात येते…या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस व रुग्णवाहिका त्वरित घटनास्थळी दाखल होतात…

आगीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु होते… अग्निबंबाच्या माध्यमातून कंपनीतील कामगारांनी आग विझविण्याचा प्रयत्न सुरू असतो… तरडे येथील बीपीसीएल कंपनीत अचानक पोलीस यंत्रणा व अन्य यंत्रणा आल्याने काही काळ नागरिकही घाबरले होते…हा सर्व थरार पाहण्यासाठी रस्त्यावर मात्र बघ्यांची तोबा गर्दी उसळते… पाहता पाहता आगीच्या या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरते…सर्वांच्या मोबाईलमध्ये फोटो अन् घटनेचे अपडेट्स येतात… मात्र, दीड तासाने सर्वांना हा मॉक ड्रिल असल्याचे समजताच घटना पाहणारे दर्दी आणि फोटो घेणारे मोबाईल बहाद्दर डोक्याला हात लावून पळ काढतात…

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मदतीचा कॉल आला. तेंव्हा लोणी काळभोरचे पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, गोपनीय विभागाचे प्रमुख पोलीस हवालदार रामदास मेमाणे, रवी आहेर, संदीप जोगदंड, बीट मार्शलसह पोलिसांचा मोठा फौजफाटा अवघ्या 15 मिनिटाच्या आत मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनतर मॉक ड्रिलची माहिती पोलीस ठाण्यात कळविली. तेंव्हा पोलिसांची धावपळ थांबली. मॉक ड्रिल असल्याचे समजताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तर घटनास्थळी टँकरला लागलेली आग कंपनीतील अग्निबंबाच्या सहाय्याने विझविली.

दरम्यान, प्रत्यक्षात कंपनीच्या टँकरला खरीच आग लागल्यास त्यास कसे सामोरे जावे, काय-काय खबरदारी घ्यावी. कोणी काय जबाबदारी पार पाडावी, याची रंगीत तालीम म्हणजेच हे मॉक ड्रिल होय. एचपीसीएल कंपनी प्रशासनाने मॉक ड्रिलच्या माध्यमातून अग्निसुरक्षेसंदर्भात जनजागृती केली आहे.







