लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) कृष्णा बाबर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडून मोठी कारवाई केली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे पोलीस वर्तुळात आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका दाखल गुन्ह्यातील आरोपीचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यासाठी आणि प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात API कृष्णा बाबर यांनी आरोपीच्या नातेवाईकाकडे लाचेची मागणी केली होती.

याबाबत संबंधित तक्रारदाराने याबाबत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), पुणे यांच्याकडे अधिकृत तक्रार नोंदवली. तक्रारदाराच्या अर्जाची गांभीर्याने दखल घेत, ACB च्या पथकाने अत्यंत गुप्तपणे लाचेच्या मागणीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान एपीआय कृष्णा बाबर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, अधिकाऱ्यांनी लोणी काळभोर परिसरात नियोजनबद्ध पद्धतीने ‘सापळा’ रचला.

ठरल्याप्रमाणे तक्रारदार लाचेची रक्कम देण्यासाठी गेले असता, कोणतीही शंका न येता लाचेची रक्कम स्वीकारणाऱ्या API कृष्णा बाबर यांना ACB च्या पथकाने दबा धरून जागीच झडप घालून रंगेहाथ बेड्या ठोकल्या. खाकी वर्दीला गालबोट लावणाऱ्या या कारवाईमुळे लोणी काळभोर पोलीस ठाण्यासह संपूर्ण पुणे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रकरणात ACB कडून पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि गुन्हा दाखल करण्याची कारवाई वेगाने सुरू आहे. लाचेची नेमकी रक्कम किती होती, कारवाईचे निश्चित ठिकाण आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबतचा सखोल तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे.







