पुणे : पुण्याजवळ असलेल्या बोपदेव घाट परिसरात एका 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती, त्याबाबत एकच संतापाची लाट उळल्याचे दिसून आले. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच या घटनास्थळाला काल(मंगळवारी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र प्रवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी बोपदेव घाट परिसरात झालेल्या घटनास्थळी पाहणी केली, त्यानंतर पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी पुण्यासह राज्यात घडत असलेल्या घटनांबाबत संताप व्यक्त केला आहे, यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी संबंधित घटना घडून पाच दिवस झाले, पुण्यात असूनही स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला खूपच दिवस गेले, असं म्हणत सुप्रिया सुळेंवर टीकेचा बाण सोडला.
झोपी गेलेल्याला जाग करता येत, पण..: रूपाली चाकणकर
बोरदेव घाटात घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाला घडून पाच दिवस उलटून गेले, पुण्यात असूनही स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले, मुळातच पोलिसांनी पहिल्या दिवसापासून 12 टिम तयार करून युद्धपातळीवर तपास करीत आहेत. मग आपला हा देखावा कशासाठी??? आपल्या माहितीसाठी, चंद्रपुरमध्ये कोरपना येथे 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारा शिक्षक हा युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे, याविरोधात आंदोलन कधी करणार? आपल्या सोशल मिडियाच्या प्रदेश सरचिटणीसवर महिलांचे अश्लील व्हिडीओ बनविणे-पाठवणे, अश्लाघ्य कमेंट करणे यासाठी चार सायबर गुन्हे दाखल आहेत, पोलीस कोठडीही घेऊन आलेल्या या आरोपीला आपण नियुक्तीपत्र देता, नक्की कशाचे समर्थन करता? त्याच्याविरोधात आंदोलन कधी करणार? कालच नगरमध्ये भानुदास मुरकूटेंवर लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला, जे आपल्यासोबतचे पदाधिकारी आहेत, यांच्याविरोधात आंदोलन, पत्रकार परिषद कधी घेणार? झोपी गेलेल्याला जाग करता येत, पण झोपेचं सोंग घेणाऱ्यांना नाही, म्हणून आपल्या माहितीसाठी NCRB चा काल प्रकाशित झालेला अहवाल देत आहे, असं म्हणत रूपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार घणाघात केला.
बोपदेव घाटात घडलेल्या घटनेवर सुळेंचा संताप..
बोपदेव घाट प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.त्या म्हणाल्या की, मंत्रालयात तडजोडी होत असल्याने गुन्हेगारांना वचक राहिलेला नाही. आठवड्यानंतरही बोपदेव घाट प्रकरणातील आरोपींना अटक झालेली नाही. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी वाढत असून, गृहमंत्री फडणवीस जबाबदार नाहीत का? प्राप्तिकर विभाग, ईडी तसेच सीबीआयचा वापर विरोधकांच्या अटकेसाठी केला जात आहे. मग याच यंत्रणांचा वापर बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी का होत नाही? पोलिसांची, वर्दीची भीती गुन्हेगारांना का राहिलेली नाही?’, असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.