नीरा (पुणे): पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी येथील शरदविजय सोसायटीत मागील दोन-तीन वर्षांपासून लाखो रुपयांचा गैरव्यवहार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पुणे जिल्हा बँके आणि सहकार खात्याने मात्र तोंडावर बोट ठेवणे पसंत केले आहे. यामुळे सोसायटीच्या निर्ढावलेल्या सचिवाने आत्तापर्यंत सुमारे शंभर शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्जे उचललेली आहेत. कर्जाची ही रक्कम जवळपास दीड कोटींच्या घरात आहे. यातील काही शेतकऱ्यांनी हातापाया पडून निम्मी रक्कम भरून घेतली आहे.
पुरंदर तालुक्यातील नावाजलेल्या शरद विजय सोसायटीत सत्तांतर झाल्यानंतर मंगेश सुभाष निगडे यांची सचिव पदी निवड करण्यात आली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार फोफावला. मे-२०२२ मध्ये ज्ञानदेव निगडे आणि मे-२०२३ मध्ये बाळासाहेब निगडे हे सोसायटीचे अध्यक्ष झाले. २०२२-२३ च्या लेखापरीक्षण अहवालामध्ये ३२ शेतकऱ्यांच्या नावावर पुणे जिल्हा बँकेच्या निरा शाखेतून बनावट पद्धतीने ४४ लाखांचे दुबार कर्ज काढल्याचा गैरव्यवहार उजेडात आला. शेतकऱ्यांनी आपले कर्ज “निल” केले, तरी त्यांच्या नावे बोगस कर्ज सचिवाने उचलल्याचे आणि पैसे लंपास केल्याचे समोर आले. तसेच संचालक मंडळानेही वार्षिक सभेत याविषयी चर्चा न करता विषय झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आणि संचालकांनी हातापाया पडून या व्यवहाराची रक्कम भरून घेतली आहे. सचिवाने ऑगस्ट अखेरपर्यंत २६ लाख ५७ हजार तर सप्टेंबर अखेरपर्यंत १७ लाख ४५ हजार रुपये भरले. त्यामुळे ३२ शेतकऱ्यांनी सुटकेचा एकच निश्वास सोडला.
परंतु, मार्च २०२३ नंतरही सचिव आणि त्यांच्या संबंधित लोकांनी ही कार्यपद्धती तशीच सुरु ठेवली आहे. आता मार्च २०२४ पर्यंतचा लेखापरीक्षण अहवाल येईल तेव्हा वास्तव समोर येणार आहे. शेतकऱ्यांनी पुणे जिल्हा बँक, पोलीस आणि सहकार खाते यांच्याकडे आपल्या नावावर बोगस कर्ज काढले असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. शेतकऱ्यांची संख्या ही जवळपास ६८ असून, गैरव्यवहाराचा आकडा हा एक कोटीचा असल्याचा अंदाज आहे.