उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन परिसरातून रविवारी (ता. 13) सायंकाळी बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह सोमवारी (ता. 14) दुपारी उरुळी कांचन रेल्वे लाईन जवळ असलेल्या एका शेतातील पाण्याच्या टाकीत आढळून आला आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) गावचे हददीतील रेल्वे लाईनचे दक्षीण बाजुला असलेल्या संग्राम पाटील यांच्या शेतातील पाण्याच्या टाकीमध्ये हा मृतदेह आढळून आला आहे.
सुनंदा चंद्रकांत सुयर्वंशी (वय – 57, रा. कांचन वृंदावन सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे, मुळ रा. मु. बेलुर, ता. अहमदपुर, जि. लातुर) असे मृतदेह आढळून आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा प्रदिप चंद्रकांत सूर्यवंशी (वय- 34) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनंदा सुयर्वंशी या राहत्या घरातून रविवारी सायंकाळी बेपात्ता झाल्या होत्या. नातेवाइकांनी सगळीकडे सुनंदा सुयर्वंशी यांचा सोशल मिडीया तसेच आजूबाजूला नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु, त्या कोठेही आढळून आल्या नाहीत.
सोमवारी सकाळी उरुळी कांचन पोलिसांना माहिती मिळाली की, रेल्वे लाइनच्या बाजूला असलेल्या संग्राम पाटील यांचे शेतातील पाण्याच्या टाकीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे, अशी माहिती मिळाली होती. सदर ठिकाणी पोलीस गेले असता पोलिसांनी फिर्यादी प्रदिप सूर्यवंशी याला ओळख पटविण्यासाठी फोनवरून माहिती दिली.
त्यानुसार नातेवाईक व आणखी दोघेजण सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता पाण्याचे टाकीमध्ये असलेली महिला ही सुनंदा सुयर्वंशी असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी व त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी सुनंदा सुयर्वंशी यांना टाकीतून बाहेर काढून उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले.
दरम्यान, मुलगा प्रदिप सूर्यवंशी यांनी दिलेल्या जबाबानुसार आईचे मृत्युबाबत कोणावर ही संशय नसल्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.