पुणे : सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडिया ही अपरिहार्य बाब झाली आहे. परंतु त्याचा वापर कसा करावा, याचे ज्ञान आणि भान काही सर्वांनाच नाही. अलीकडची तरुणाई तर अक्षरश: सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सोशल मीडियावर तुटून पडलेली असते. एकंदरीतच सोशल मीडियाचं व्यसन ही तरुणाई पुढची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातूनच ते टोकाचं पाऊल उचलतात. यापूर्वी मोबाईल व्यसनाधिनता आणि मोबाईल गेमिंगच्या नादातून अशा घटना घडल्या आहेत.
आता, पिंपरी चिंचवडमधील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीत शिकणाऱ्या मुलाला ब्लु व्हेल गेमचं व्यसन लागले होते. या व्यसनाच्या आहारी तो इतका गेला की, याचा शेवट आत्महत्येने झाला. या 15 वर्षीय मुलाने थेट चौदाव्या मजल्यावरून उडी घेतल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडच्या किवळे भागात घडली आहे. 26 जुलै रोजी रात्री मुलाने घराच्या इमारतीवरुन उडी घेत आपलं जीवन संपवलं.
आर्य शिरराव असे या मुलाचं नाव आहे. आर्य गेल्या सहा महिन्यांपासून ब्ल्यू व्हेल गेमच्या विळख्यात अडकला होता. तो दिवसदिवसभरात आपल्या खोलीत बसून राहायचा. याशिवाय या काळात मृत्यूसंदर्भातील गाणी त्याला आवडू लागली होती. तो मोठ्या आवाजात मृत्यूसंदर्भातील इंग्रजीतील गाणी ऐकत होता. धक्कादायक बाब म्हणजे त्याने इमारतीवरुन उडी मारण्यापूर्वी स्वत:च्या मृत्यूचा प्लॅन आखला होता. त्याने पेन्सिलिने याचे स्केच तयार केले होते.
अतिवृष्टीमुळे 25 जुलैला शाळांना सुट्टी होती, तो ही दिवस आर्यने गेम खेळण्यामध्येच घालवला. मग रात्री घरच्यांनी अनेक विनवण्या केल्यानंतर तो जेवणासाठी बाहेर आला. मात्र, जेवण केल्यावर पुन्हा तो खोलीतचमध्येच जाऊन बसला. आई-वडील दुसऱ्या मुलाला ताप आल्याने चिंतेत होते. रात्रीचा एक वाजला तरी देखील मुलाचा ताप उतरेना, त्यामुळे आई जागीचं होती. त्याचवेळी सोसायटीच्या व्हाट्सअॅपवर एक मुल जखमी अवस्थेत खाली पडल्याचा मेसेज आला. तो मेसेज मुलाच्या आईने वाचला अन तिला थोडी कुणकुण लागली. मग ती खोलीच्या दिशेने गेली, पण मुलगा घरात नव्हता, त्यानंतर धावाधाव करत ती जखमी अवस्थेत पडलेल्या मुलाजवळ पोहचली, बघते तर काय? तो तीचाचं मुलगा होता.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पोटच्या लेकाला पाहून, आईची पायाखालची जमीनचं सरकली. मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घरात एका कागदावर गेममधील कोडिंगच्या भाषेत लिहिलेलं काहीतरी आढळलं. मात्र यातून त्याला काय नमूद करायचं होतं, याचा शोध आता पिंपरी चिंचवड पोलीस लावत आहेत.
काही वर्षांपूर्वी ब्लू व्हेल गेम खूप चर्चेत आला होता. या गेमचा शेवटचा टप्पा म्हणजे स्वतःला संपवणं. अशातच हा गेम खेळत असताना प्रत्येक टप्पा पार करीत 15 वर्षांच्या आर्यने शेवटच्या टप्प्यात स्वतःला संपवलं अन् बाल्कनीतून उडी मारली.