लोणी काळभोर, (पुणे) : रौद्रशंभु प्रतिष्ठानच्या वतीने खोकलाई माता चौक लोणी काळभोर येथे श्रीराम नवमी उत्सवानिमित्त रक्तदान शिबीराचे शनिवारी (ता. 13) आयोजन करण्यात आले होते. जनसेवा ब्लड सेंटर या रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात जवळपास ११८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
अंबरनाथ प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष ह.भ.प.विनोद महाराज काळभोर यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, सदस्य भरत काळभोर, सोसायटीचे माजी अध्यक्ष धोंडिबा काळभोर, दिग्विजय काळभोर, डेअरीचे मालक योगेश काळभोर व इतर मान्यवर उपस्थित होते.
श्रीराम नवमी उत्सवानिमित्त रौद्रशंभु प्रतिष्ठानच्या वतीने सलग पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये रक्तदान शिबिराबरोबरच मोफत आरोग्य तपासणी, मोफत अक्युप्रेशर थेरपी शिबीर, वृद्धाश्रमात अन्नदान, गोशाळेत मोफत चारा वाटप, शालेय विद्यार्थ्यांना मोफत परीक्षेपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप, श्रीराम नवमी निमित्त श्री राम मंदिर व श्रीक्षेत्र रामदरा याठिकाणी भाविकांना मोफत पिण्याचे पाणी वाटप या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन रौद्रशंभु प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, रौद्रशंभु प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या युवा शक्तीचे कौतुक यावेळी उपस्थित नागरिकांनी केले.