पुणे : पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा विधानसभा मतदारसंघात तीस वर्षांनंतर पहिल्यांदा उमेदवार जाहीर करताना उशीर केला जात असल्याची चर्चा आता मतदारसंघात रंगली आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत मुक्ता टिळक यांचे नाव ठळक अक्षरात अधोरेखित करण्यात आले होते. मात्र, २०२४ ची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आणि भाजपाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतरही कसब्याचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाही.
कसबा आणि भाजप हे समीकरण गिरीश बापट यांनी जवळपास ३० वर्षांपेक्षा अधिक काळ कायम ठेवले होते. कसब्यातून बापटांनी प्रतिनिधित्व करताना मतदारसंघ बांधून घेतला होता. बापट खासदार झाल्यानंतर २०१९ ला ही जागा पालिकेच्या भाजपाच्या पहिल्या महापौर मुक्ता टिळक यांना देण्यात आली. त्यांनी २०१९च्या निवडणुकीत भाजपाला यश मिळून दिले. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली.
या पोटनिवडणुकीत भाजपाकडून स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती. ही पोटनिवडणूक देशाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची झाली होती. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे या निवडणुकीसाठी प्रचारासाठी आले होते. मात्र, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय संपादन केला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कसब्यात भाजपाला मताधिक्य मिळाले होते. तरीसुद्धा भाजपाची उमेदवारी कोणाला द्यावी, यावरून आता खलबते सुरू झाली आहेत. त्यात कोणाला संधी मिळणार, हे पाहावे लागणार आहे.