पुणे : देशातील कांद्याची उपलब्धता लक्षात घेता नियोजनाच्या दृष्टीने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर शुल्क लावून शेतकऱ्यांचे होऊ शकणारे नुकसान लक्षात घेता नाशिक अहमदनगर जिल्ह्यातून २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यात येणार असून त्यामुळे आम्ही केंद्र सरकारचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिली आहे.
केंद्र सरकार नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी संघाच्या मार्फत नाशिक आणि अहमदनगर येथे यासाठी विशेष खरेदी केंद्र सुरू करतआहे. सरकारने २४१० प्रतिक्विंटल या दराने कांदा खरेदी चा निर्णय घेतला असून यातून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असेही भेगडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी सरकारच्या खरेदी केंद्रावरच आपला साठवणूक दर्जाचा कांदा द्यावा असे आवाहन भेगडे यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे काही घटक शेतकऱ्यांची दिशाभूल करत शेतकऱ्यांचे नुकसान करत असल्याचे त्यांनी म्हटले असून कुणावर अन्याय होत असल्यास सरकार दरबारी आपले म्हणणे मांडून त्यावर तोडगा काढता येईल, मात्र यासाठी बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायला हवी असेही त्यांनी सांगितले.