हडपसर (पुणे) : हडपसर परिसरातील सातववाडी येथील बिर्याणी हॉटेल व चिकन शॉपला सिलेंडर लिकेज झाल्यामुळे लागलेल्या आगीत दोन दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी (ता. ११) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी दोन्ही दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. हडपसर अग्निशमन केंद्राच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर सातववाडी परिसरात बिर्याणी हॉटेल व चिकन शॉपला रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती माजी नगरसेवक सुनिल बनकर यांनी हडपसर अग्निशमन केंद्राला दिली. मिळालेल्या माहितीच्या अनुशंगाने काळे बोराटेनगर अग्निशमन केंद्राचे जवान केंद्र प्रमुख अनिल गायकवाड, चालक राजू शेख, फायरमन अनिमेष कोंडगेकर, केतन गाडगे, संकेत शिंदे यांनी घटनास्थळी पोहोचले.
या वेळी त्यांना एक छोटा सिलेंडर फुटल्याचे निदर्शनास आले. या वेळी त्याच्या बाजूला असलेला एक छोटा लिकेज सिलेंडर व एक मोठा सिलेंडर बाहेर काढला. हे दोन्ही सिलेंडर तत्काळ बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत दोन्ही दुकानांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.
दरम्यान, हडपसर अग्निशमन केंद्राचे जवान चालक नारायण जगताप, फायरमन बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले, नितेश डगळे यांच्या मदतीने दोन्ही बाजूने पाणी मारून अर्ध्या तासात आग आटोक्यात आणण्यात यश आले.