पुणे प्राईम न्यूज डेक्स : पुणे शहर व पुणे जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत मुलींच्या जन्माचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. काही वर्षांपूर्वीच राज्यात स्त्री-पुरूष जन्मदराच्या गुणोत्तरात राज्यात पहिल्या क्रमांकाचे शहर असलेल्या पुण्यात 2020 मध्ये मुलींच्या जन्मदराचे प्रमाण 946 पर्यंत गेले होते. हे प्रमाण गेल्या तीन वर्षांत कमालीचे घटले असून, 2023 मध्ये हे प्रमाण 977 पर्यंत खाली आहे.
2010 मध्ये 789 असलेले हे गुणोत्तर 2015 मध्ये 925, 2020 मध्ये 946 तर 2023 मध्ये हे गुणोत्तर 877 पर्यंत खाली आले आहे. कुठल्याही ठिकाणी एक हजार मुलांच्या जन्मामागे मुलींच्या जन्माच्या आकडेवारीवरून लिंग गुणोत्तर निश्चित केले जाते. लिंग गुणोत्तर हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रियांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण 1:1 असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगवेगळे आढळते.
भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे. 2011 सालच्या जनगणनेनुसार भारतात 1000 पुरुषांमागे 940 स्त्रिया आहेत. म्हणजेच लिंग गुणोत्तर 940 आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मागील काही वर्षांत बेकायदेशीररीत्या लिंग निदानाचे प्रमाण वाढले. ‘मुलगाच हवा’ या मानसिकतेमुळे मुलीचा गर्भ खुडला जातो. ‘हम दो हमारे दो,’ ‘हम दो हमारा एक,’ ‘लहान कुटुंब’ या संस्कृतीत मुलगा हवाच अशी अनेकांची मानसिकता झालेली असते. याचा परिणाम लिंग गुणोत्तरावर झालेला दिसतो.
देशांत अनेक राज्यांत असमतोल लिंग गुणोत्तर असल्याने तेथे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. लिंग गुणोत्तराचे प्रमाण अशाच प्रकारे घटत राहिल्यास यात समाजाचा समतोल बिघडू शकतो. सध्या कित्येक समाजांत मुलींचे प्रमाण अतिशय कमी असल्याने लग्नासाठी मुलीच नाहीत, अशी स्थिती आहे.
2020-21 च्या तुलनेत देशात 2022-23 या वर्षात बिहार, छत्तीसगड, दिल्ली, हरियाना, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मिझोराम, नागालँड, पश्चिम बंगाल या राज्यांत मुलींची संख्या घटली आहे. तर, लडाख या केंद्रशासित प्रदेशात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या जास्त आहे. तेथील 2022-23 मधील लिंग गुणोत्तर एक हजार मुलांमागे 1 हजार 23 मुली असे आहे.
पुणे जिल्ह्यातही मुलींचे प्रमाण घटतंय
पुणे जिल्ह्यातही मुलींच्या संख्येचे घटते प्रमाण चिंताजनक बनले असून, जिल्ह्यातील 575 ग्रामपंचायतींमध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण हे दर हजारी 912 पेक्षाही कमी आहे. हवेली तालुक्यातील 37, आंबेगाव – 46, जुन्नर – 59, बारामती – 38, इंदापूर – 48, मावळ – 51, मुळशी – 33, खेड – 64, शिरूर – 57, भोर – 39, वेल्हा – 19, दौंड – 40, पुरंदर तालुक्यातील 44 ग्रामपंचायतींमध्ये लिंग गुणोत्तर खुपच कमी आहे.
2011 च्या जनगणनेनुसार प्रत्येक एक हजार मुलांमागे 883 मुली असल्याची नोंद आहे. जैविक मानकांनुसार प्रत्येक एक हजार मुलांमागे 940-950 मुली असणे आवश्यक आहे. या संदर्भातील केंद्र व राज्य सरकारचे विविध उपक्रम आणि कायदे अजून प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन बाल लिंग गुणोत्तर वाढविण्यास मदत होऊ शकते. बाल लिंग गुणोत्तर आणखी सुधारण्यासाठी आणि स्त्री भ्रूण हत्या किंवा बालिका हत्येची प्रथा नाहीशी करण्यासाठी, माता आणि कुटुंबांचे समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे.
रुग्णालयांची अचानक व कडक तपासणी, जनजागृती, लिंगनिदान कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केल्यास मुलींचा जन्मदर वाढण्याची शक्यता आहे. पण याकडे लक्ष न दिल्यास मुलींच्या जन्मदरात घसरण सुरू होते. आरोग्य विभागाकडून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. त्यात प्रामुख्याने बेकायदा गर्भपात रोखणे, गर्भलिंग निदान रोखण्यासाठी हॉस्पिटल, सोनोग्राफी केंद्रांची तपासणी, गर्भवती मातांची जनजागृती, दोषींवर कारवाई करणे अपेक्षित आहे. त्यासाठी या विभागात जबाबदार अधिकारी नेमणे आवश्यक आहे. मात्र, आरोग्य विभागात सातत्याने अधिकारी बदलले जातात. त्याचा परिणाम जनजागृती आणि मुलींच्या जन्मावर होत आहे.
राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर ( पुणे जिल्हाध्यक्ष, प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ)