दौंड (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील रावणगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी (ता. ११) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास इरिगेशन कॉलनीजवळ ही घटना घडली.
परशुराम विठ्ठल खवळे (वय- ३८, रा. पाषाण, पुणे, मुळ रा. जळकेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ सोमनाथ विठ्ठल खवळे (वय – ३०) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ खवळे हे पुण्यातील पाषाण परिसरात बहिणीच्या घरी राहण्यास असून, भंगार व्यवसाय करतात. परशुराम व सोमनाथ हे गावावरून पुण्याला दुचाकीवर आले होते. सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास परशुराम हा गावाकडे दुचाकीवर एकटा निघाला होता. रावणगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गेला असता त्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
दरम्यान, यावेळी अनोळखी इसमाने फोन करुन सांगितले की, रावणगांव येथे तुमच्या भावाचा अपघात झाला आहे. व त्याला दौंड येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. सदर ठिकाणी बहिण व सोमनाथ गेले असता डॉक्टरांनी परशुराम याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. यावरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार भागवत करीत आहेत.