पिंपरी : भरधाव वेगात जाणाऱ्या पाण्याच्या टँकरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात टँकरचे मागील चाक डोक्यावरुन गेल्याने दुचाकीवरील युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रस्त्यावर बुधवारी (ता. २१) सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरुन पळून गेला आहे.
अमोल प्रकाश काकडे (वय-३८, रा. पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार अमोल रेणदेव मोराळे (वय-३९) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन टँकर (एम एच ४५ १५८४) चालकावर मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल काकडे हे त्यांच्या दुचाकीवरुन (एमएच १४ डि.के. ७३००) जात असताना, भरधाव वेगात जाणाऱ्या पाण्याच्या टँकर चालकाने त्यांच्या ताब्यातील गाडी बेदरकारपणे चालवून काकडे यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील काकडे गाडीवरून खाली पडले. टँकरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्तस्त्राव होऊन अमोल हे गंभीर जखमी झाले. या अपघाात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर आरोपी चालक टँकर घटनास्थळी सोडून पळून गेला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.