पुणे : पुरंदर ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करून मुख्य सचिवांनी तत्काळ केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनीही तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून, तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सासवड तहसील कार्यालयातून चोरीला गेलेले ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरीला गेल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत २ चोरांना या प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कंट्रोल युनिट जेजुरीमधून अटक केली आहे.
चोरट्यांनी ही चोरी नेमकी कशासाठी केली, याचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यामध्ये या व्यतिरिक्त आणखी कोण सामील आहेत का? याबाबतचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे. याबाबत सासवड तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारी अशी दोन दिवस तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूमचे कुलूप तोडलेले आढळून आले. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीनमधून एक ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याचे समजताच एकच खळबळ उडाली होती.
पुण्यातील काँग्रेसचे नेते, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य रमेश अय्यर यांनी ईव्हीएमबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ईव्हीएम मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ आणि दिनांक प्रसिद्ध करण्यात यावी, अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या आज सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मत मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे.