पुणे : मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. राज्य सरकार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना बंद करणार नसून चालू ठेवणार आहे. कोणाचेही पैसे परत घेतले जाणार नाहीत. तसेच या योजनेसाठी कोणतेही नविन निकष लावणार नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली आहे.
अधिक माहिती अशी की, शनिवारी (८ फेब्रुवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंदू गर्जना’ कुस्ती स्पर्धेला भेट दिली असता तेथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘आम्ही जनतेच्या पैशाचे रक्षक आहोत. पण आम्हालाही महालेखापालांनी विचारल्यावर उत्तर द्यावे लागते. त्यामुळे जर कुणी नियमांचे उल्लंघन करून फायदा घेत असेल, तर त्यांना प्रतिबंध केला जाईल. त्यामुळे सरकारने पडताळणीस सुरुवात केली आहे.
सरकारकडून ‘लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही नवा निकष लावला जाणार नाही. योजना जाहीर केलेल्या वेळेस जे निकष होते तेच कायम राहणार आहेत. निकषांचे उल्लंघन करून ज्या महिलांनी लाभ घेतील त्यांच्यावरच कारवाई होत आहे. सरकार कोणाचेही पैसे परत घेणार नाही. जे निकषाचे उल्लंघन करून फायदा घेत आहेत, त्यांच्यावर कारवाई निश्चितपणे होईल’. असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.