पुणे : पुणे शहर पोलिस दल कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. त्यात आता एका पोलिस अधिकाऱ्यासह तब्बल ९ जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. त्यामुळे पुणे शहर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. ससून रुग्णालयातून ड्रॅग्ज रॅकेट चालवणारा ड्रॅग्ज माफिया ललित पाटील पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
ससून रुग्णालयात ड्रग्स माफिया ललित पाटील याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास ललित पाटील याने छातीत दुखत असल्याचे कारण दिले होते. त्यावेळी एक्स-रे काढण्यासाठी ससून रुग्णालयातील वॉर्डमध्ये गेला होता. वार्ड क्रमांक १६ येथे एक्स-रे काढण्याच्या बहाण्याने गेल्यानंतर मागच्या आऊट गेटने तो बाहेर पडला. पोलिसांच्या तावडीतून अशाप्रकारे आरोपी पळून गेल्याने शहर पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
दरम्यान, या सर्व प्रकाराची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, मोठ्या गुन्हेगाराबाबत बेजबाबदार आणि गैरवर्तणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिस दलातील एका अधिकाऱ्यासह तब्बल ९ जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. या कारवाईमुळे पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
कोणावर झाली कारवाई?
पोलिस उपनिरीक्षक जनार्दन काळे, पोलीस अंमलदार दिगंबर चंदनशिव, विशाल ठोपले, स्वप्नील शिंदे, हवालदार आदेश शिवणकर यांच्यासह आणखी चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.