Big Breaking News पुणे ता. २९ : उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राकडून दोन महिन्यांपूर्वी हर्ष सागर जगताप या 20 महिन्यांच्या बालकाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याचे प्रकरण समोर आले होते. हे प्रकरण उरुळी कांचनचे ग्रामस्थ विसरण्याच्या मार्गावर असतानाच शुक्रवारी (ता.२८) सायंकाळी पुन्हा एकदा उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ‘हद्दी’चे कारण पुढे करत शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. (Big Breaking News)
उरुळी कांचन ग्रामपंचायतीने उरुळी कांचन पोलिस चौकीच्या हद्दीबाहेरील व्यक्तींचे शवविच्छेदन करु नये, असा ठराव केल्याने शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी लोणी काळभोर येथील 24 वर्षीय मृत तरुणाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याचा दावा उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी केला आहे. (Big Breaking News)
लोणी काळभोरच्या तरुणाचे शवविच्छेदन करण्यास सुरुवातील नकार दिला असला तरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामदास हंकारे यांच्या हस्तक्षेपानंतर मात्र डॉ. कदम यांनी शवविच्छेदन करण्यास होकार दिला. मात्र, ज्या ठरावाच्या आधारे डॉ. कदम यांनी सरुवातीला नकार दिला तो ठरावच ग्रामपंचायतीने केला नसल्याची माहिती उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’ला दिली.
दरम्यान, ‘हद्दी’चे कारण पुढे करत लोणी काळभोर येथील 24 वर्षीय मृत तरुणाचे शवविच्छेदन करण्यास नकार देणे ही बाब अतिशय धक्कादायक आहेच पण ग्रामपंचायतीच्या त्या कथित ठरावाच्या आधारे डॉ. सुचिता कदम यांनी मृत तरुणाचे शवविच्छेदन करण्यास नकार त्याहूनही धक्कादायक बाब आहे. बेकायदा ठराव करणारी ग्रामपंचायत व त्याच्या आधारे कामचुकारपणा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची सखोल चौकशी करुन, दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे उरुळी कांचनचे शहराध्यक्ष अमित कांचन यांनी केली आहे. (Big Breaking News)
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
लोणी काळभोर येथील आकाश केशव झेंडे या 24 वर्षीय तरुणाने शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी चारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांनी त्यांचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण होताच, आकाश झेंडे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उरुळी कांचन येथे नेण्याबाबत आकाशच्या नातेवाईकांना कळवले.
‘वरिष्ठांना विचारा’ म्हणत डॉ. कदम यांचा फोन कट
आकाशचा मृतदेह मिळताच भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अमित कांचन यांनी डॉ. सुचिता कदम यांना फोन करुन शवविच्छेदनासाठी आकाशचा मृतदेह घेऊन येत असल्याची माहिती दिली. यावर डॉ. कदम यांनी उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार हद्दीबाहेरील व्यक्तींचे शवविच्छेदन करता येत नाही. त्यामुळे मृत आकाश झेंडे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करता येणार नाही, असे अमित कांचन यांना कळवले. प्राथमिक आरोग्य केंद्र हे जिल्हा परिषदेचे असल्याने ग्रामपंचायतीवरील ठराव कसा करु शकते व तो ठराव तुम्हाला कसा लागू होतो, असा प्रश्न अमित कांचन यांनी डॉ. कदम यांना विचारताच डॉ. कदम यांनी ‘वरिष्ठांना विचारा’ असे म्हणत फोन कट केला.
…तर मग आदेश देणारी ग्रामपंचायत कोण?
वैद्यकीय अधिकाऱ्यांना पगार जिल्हा परिषदेचा मग आदेश देणारी ग्रामपंचायती कोण? उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राकडुन दोन महिन्यांच्या काळात शवविच्छेदन करण्यास टाळाटाळ केल्याच्या दोन घटना पुढे आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रे जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असून, त्या ठिकाणी काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांचा पगार जिल्हा परिषद करते.
मात्र, उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या कथित ठरावाची ‘ढाल’ पुढे करत उरुळी कांचन पोलिस चौकीच्या हद्दीबाहेरील व्यक्तींचे शवविच्छेदन करण्यास नकार देणे ही बाब चुकीची आहे. डॉ. कदम यांनी ग्रामपंचायतीच्या ठरावाचे कारण पुढे केले असले तरी, सरपंच भाऊसाहेब कांचन यांनी मात्र हा ठराव केला नसल्याची माहिती दिली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना पगार जिल्हा परिषद देत असेल तर वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश देणारी ग्रामपंचायत कोण? असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.
ग्रामपंचायतीचे आदेश न टाळण्याचा वरिष्ठांचा सल्ला
याबाबत डॉ. सुचिता कदम म्हणाल्या, ‘उरुळी कांचन ग्रामपंचायतीने उरुळी कांचन पोलिस चौकीच्या हद्दीबाहेरील व्यक्तींचे शवविच्छेदन करु नये, असा ठराव केला आहे. त्यासंदर्भात सरपंच भाऊसाहेब कांचन यांनी आदेश दिल्याने लोणी काळभोर येथील आकाश झेंडे यांचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला होता. याबाबत वरिष्ठांकडे विचारणा केली असता त्यांनीही ग्रामपंचायतीचे आदेश टाळू नये, असा सल्ला दिला होता. आम्हाला पगार जिल्हा परिषद देत असली तरी शवविच्छेदन करण्यासाठी लागणारा कटर व एक सहाय्यक व्यक्ती ग्रामपंचायत पुरवत असल्याने त्यांचा आदेश मानावा लागतो. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.
ठराव नव्हे तर तोंडी सूचना
वादग्रस्त ठरावाबद्दल बोलताना सरपंच भाऊसाहेब कांचन म्हणाले, उरुळी कांचन पोलिस चौकीच्या हद्दीबाहेरील व्यक्तींचे शवविच्छेदन करु नये, अशा आशयाचा कोणताही ठराव ग्रामपंचतीने केलेला नाही. डॉ. कदम यांना तोंडी काही सूचना केल्या होत्या. शवविच्छेदन करण्यासाठी लागणारा कटर व एक सहाय्यक व्यक्ती ग्रामपंचायत पुरवत असल्याने, त्याचा बोजा ग्रामपंचायतीवर पडत आहे. पण याबाबत ठराव झाला नाही तर तोंडी सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वादग्रस्त ठराव करणारे व ठराव मानणारे दोघेही दोषीच
याबाबत भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष जनार्दन दांडगे म्हणाले, ‘उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ‘हद्दी’चे कारण पुढे करत लोणी काळभोर येथील 24 वर्षीय मृत तरुणाचे शवविच्छेदन करण्यास नकार देणे ही बाब नियमबाह्य आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे जिल्हा परिषदेच्या ताब्यात असताना त्यांना ठराव करुन आदेश देणे ही बाबही कायद्याला धरुन नाही. वादग्रस्त ठराव करणारी ग्रामपंचायत व संबंधित वादग्रस्त ठरावाच्या नावावाखाली कामचुकारपणा करणारे वैद्यकीय अधिकारी अशा दोघांविरोधात जिल्हा परिषदेकडे तक्रार केली जाणार आहे’.