पुणे : न्हावरे येथील सरपंच अलका बिरा शेंडगे यांच्यावर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मोठी कारवाई केली आहे. उपसरपंच कविता बिडगर यांचा राजीनामा स्वीकारून तो मंजूर करण्याबरोबरच उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यास टाळाटाळ करून कामात हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांना थेट सरपंच आणि सदस्यापदावरून काढून टाकल्याचा आदेश देण्यात आला आहे.
न्हावरे ही ग्रामपंचायत शिरूर तालुक्यातील राजकीयदुष्टया महत्त्वाची समजली जाते. याच ग्रामपंचायतीच्या सरपंचावर कारवाई करण्यात आली आहे. दुसऱ्या सदस्याला पदाची संधी मिळावी म्हणून उपसरपंच बिडगर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, सरपंच शेंडगे या राजकीय द्वेषबुद्धीने संबंधित राजीनामा मंजूर करण्यास टाळाटाळ करून उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार आयुक्त राव यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
काय सांगतो नियम?
नियमाने उपसरपंचांनी आपला राजीनामा सरपंच यांच्याकडे द्यायचा असतो. संबंधित राजीनामा सरपंचांनी तो ग्रामपंचायत सभेपुढे ठेवून त्याबाबत पडताळणी करून मंजूर करायचा असतो. त्यानंतर संबंधित पद रिक्त झाल्याचा अहवाल गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना पाठवणे बंधनकारक असते. मात्र, सरपंच अलका शेंडगे यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत त्यांना पदावरून हटविण्यात आले आहे.
न्यायालयात न्याय मागणार
‘उपसरपंच कविता बिडगर यांनी त्यांचा राजीनामा नमुन्यात व कायदेशीररीत्या दिला नव्हता. हे त्यांना मी वारंवार सांगितले होते. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. उलट माझ्याविरोधात विभागीय आयुक्तांकडे चुकीच्या पद्धतीने तक्रार केली. याबाबत मी न्यायालयात व ग्रामविकासमंत्री यांच्याकडे न्याय मागणार आहे’, असे अलका शेंडगे यांनी सांगितले.