पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघात महायुतीची ताकद निर्णायक असून, गत निवडणुकीत या मतदार संघातून सुमारे ३७ हजार मतांचे लीड आढळराव पाटलांना मिळाले होते. आता त्याची पुनरावृत्ती होणार असून, यावेळी १ लाख मातांची आघाडी या मतदार संघातून राहील आणि शिरुर लोकसभा मतदार संघात भोसरी ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असेल, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरी गावठाण येथे दौरा करण्यात आला. यावेळी पदयात्रेची सुरूवात भोसरीचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर श्री हनुमान मंदिर येथे भेट दिली. पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीत आढळराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, भोसरी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. परिसरात पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात झालेला विकास, शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, कल्याणकारी योजना आणि देशाची जागतिक पातळीवर उंचावलेली प्रतिक्षा यामुळे महायुतीला निश्चितपणे मोठा जनाधार आहे. भोसरी मतदार संघातील सुमारे ५ लाख ३५ हजाराहून अधिक असलेले मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा.