जीवन सोनवणे
Bhor News : भोर : सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. मूर्तीकार मूर्तींवर अखेरचा हात फिरवत आहेत. सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती मंडपात नेण्याची लगबग सुरू झाली आहे. सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा गजबजल्या आहेत. नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. एकूणच, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उत्साहाचे, चैतन्याचे वातावरण आहे.
गणेशभक्तांचा खरेदीसाठी उत्साह
गणेश भक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आस लागली आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी भक्तगण तयारीला लागले आहेत येत्या १९ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होईल. गणेशोत्सवाच्या आधीचा हा शेवटचा आठवडा आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती मंडपात नेण्याची लगबग सुरू झाली आहे. बाप्पांच्या मंडपाच्या सजावटीसाठी भक्तगण साहित्याची खरेदी करत आहेत. गणरायाची आरास करण्यासाठी विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आल्या आहेत.(Bhor News) मखर, पाना-फुलांच्या माळा, विद्युत रोषणाई अशा वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत.
दरम्यान, प्लास्टिक बंदीमुळे कागद, क्रेपपासून तयार केलेल्या फुलांच्या माळा, फुलांची कमान, पानांच्या वेली, विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईचे तोरण विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. उत्सवापूर्वीच्या शेवटच्या आठवड्यात नसरापूरची मुख्य बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. मिठाईच्या दुकानांमध्येही ग्राहकांनी गर्दी केली होती. गणरायाच्या स्वागतासाठी गल्लोगल्ली विविध गणेश मंडळांचे मंडप उभे करण्यात आले आहेत. बाप्पाची मूर्ती आणण्यासाठी रथ सजले आहेत.
गणेशोत्सवासाठी अनेक व्यावसायिकांनी ७० ते ८० टक्के अतिरिक्त माल विक्रीला ठेवला आहे. यंदाची चवथ फुलेल, अशी आशा व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे. गणेशोत्सव काळात जास्त मागणी असते, ती कपड्यांना. त्यामुळे अनेक विक्रेत्यांनी आपल्या दुकानांत गणपती सणासाठी माल भरला आहे.
फुल मार्केटमध्ये देखील मोठी लगबग पाहायला मिळत आहे. *Bhor News) या वर्षी फुलांच्या विक्रीत ४० टक्क्यांची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारात सध्या झेंडूच्या फुलांचे दर हे ४० ते १०० तर शेवंती ६० ते २००, कानेर ६०० रुपये प्रती किलो दराने विक्री होत आहे. याचा लाभ विक्रेत्यांना होत आहे.
यंदा उत्सवावर कोविडचे सावट नसल्याने गणेश मूर्ती खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शाडू मातीच्या मूर्ती खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला असून, मागील वर्षीपेक्षा यावर्षी शाडू मातीच्या मूर्तींच्या विक्रीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पर्यावरणपूरक मूर्ती खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. (Bhor News) पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्तीची खरेदी होत असल्यामुळे घरीच गणपतीचे विसर्जन करता येणार असल्याची प्रतिक्रीया व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. पूजा साहित्य खरेदीला देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी पूजा साहित्याबरोबर आरती संग्रह, अथर्वशीर्ष अशी पुस्तके मोफत देण्यात येत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : श्रीमद् भागवत गितेत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर : प्रा.डॉ.मंगेश कराड