जीवन सोनवणे
Bhor news : भोर : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाज आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी व जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी वेळू फाटा (ता. भोर) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी (ता. १५) सभा व दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते.
सभेला मराठा बांधवांची मोठी गर्दी
मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा समाज शेती करत होता. गरज भासेल तेव्हा लढाई करून, आपले पोट भरत होता. या समाजाला त्याकाळी कुणबी असे समजले जाई. शासनाने मराठा समाजास कुणबी दाखले दिले पाहिजेत, कारण २० टक्के मराठा समाज श्रीमंत आहे; परंतु ८० चक्के समाज हा दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहे. (Bhor news) शासनास त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आम्हाला कोणाचे आरक्षण नको, आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण हवे आहे. जरांगे पाटलांनी शासनास एक महिन्याचा कालावधी दिला आहे. एक महिन्यात सरकारने निर्णय घेतला नाही, तर मराठा समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार आहे, अशी भावना या वेळी मराठा बांधवांनी व्यक्त केली.
निषेध आंदोलनादरम्यान, ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘एकच मिशन मराठा आरक्षण’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’… अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
या वेळी आयोजित सभेला मराठा बांधवांची मोठी गर्दी झाली होती. (Bhor news)कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राजगड पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.