जीवन सोनवणे
Bhor News : भोर : भोर तालुका हा ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला शांत तालुका आहे. येथील जनतेला न्याय देण्याचे काम प्राधान्याने करणार असून, सामाजिक एकोपा राखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कायद्यात रहाल, तरच फायद्यात रहाल, असे प्रतिपादन भोर पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
शांततामय गणेश मंडळाना देखील प्रोत्साहन पुरस्कार
या वेळी बोलताना पोलीस निरीक्षक पाटील म्हणाले की, भोर तालुका दुर्गम डोंगरी भागात असून, नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. येथे गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. परंतु तालुक्यात प्राधान्याने महिला तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येणार आहे. विद्यार्थिनींची छेडछाड खपवून घेतली जाणार नाही. कायद्याचा हिसका दाखवून संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्राधान्याने पाऊल उचलले जाईल. जनतेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय-अत्याचार होऊ देणार नाही.
पाटील पुढे म्हणाले की, शहरातील बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रांताधिकारी, नगरपरिषद मुख्याधिकारी तसेच व्यापारी संघटना यांच्यासमवेत बैठक घेऊन लवकरच प्रश्न मार्गी लावणार आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना ठेचून काढले जाईल. आठवडे बाजारादिवशी होणाऱ्या चोऱ्यांना आळा बसेल असे नियोजन केले आहे. सामाजिक उपक्रम राबवित असताना, आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून समाजास विविध सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल. आगामी गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या, शांततामय गणेश मंडळाना देखील प्रोत्साहन पुरस्कार दिले जातील, असे पाटील यांनी नमूद केले.
या वेळी जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम मुसळे, भुजंगराव दाभाडे, विजय जाधव, चंद्रकांत जाधव, संतोष ढवळे, संतोष म्हस्के, सूर्यकांत किंद्रे, सारंग शेटे, अर्जुन खोपडे, निलेश खरमरे, विलास मादगुडे, कुंदन झांजले, दीपक पारठे, रुपेश जाधव, विनय जगताप, इमरान आतार, स्वप्निल पैलवान, दीपक येडवे तसेच गोपनीय विभागाचे दत्तात्रय खेंगरे उपस्थित होते.