Bhigvan News : भिगवण : भिगवण गावामध्ये अतिशय संवेदनशील बनलेला विषय म्हणजे ‛डुकरे पकडण्याचा कार्यक्रम’. भिगवण ग्रामपंचायतीने याबाबतचे ऑनलाईन टेंडर काढले होते. हे टेंडर मुंबई येथील एका व्यक्तीने उचलले आहे. त्यानुसार, आज हे भिगवण येथे मोकाट फिरणारी डुकरे पकडण्यासाठी पिकअप घेऊन मुंबई येथून आले होते. सकाळी भिगवण स्मशानभूमी येथून या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर या डुकरांचे मालक यांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुढील कारवाई ही शरदनगर येथे चालू असताना त्याठिकाणीही या जमावाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
कारवाई पोलीस बंदोबस्तात चालू असतानाही भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांनी समज देऊनही जमावातील काही लोक हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात करून ग्रामपंचायत सदस्य यांना दमबाजी करण्यास सुरुवात केली.
पिकअप केला पलटी
याच जमावातील काही जणांनी मुंबई येथील कंत्राटदाराने पकडलेली डुकरे नेण्यासाठी पिकअप आणला होता. हा पिकअप पलटी करण्यात आला. अचानक घडलेल्या या गदारोळामुळे पिकअप चालक गाडीतून बाहेर आल्यामुळे पिकअप तसाच पुढे जाऊन खड्ड्यात पलटी झाला तर काही जणांनी डुकरे पकडण्यासाठी कंत्राटदाराने आणलेल्या कामगारांवर दगडफेक केली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
तसेच पोलिसांशी हुज्जत घालून कारवाईला विरोध करण्यास सुरुवात केली. भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांनी यावेळी कठोर निर्णय घेत या जमावातील काही जणांना अटक केली व चांगलाच ‘प्रसाद’ दिला. या कारवाईनंतर हुज्जत घालणाऱ्यांना भिगवण पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले आहे.