पुणे : भारतात मुलींची देशातील पहिली शाळा पुण्यातील ज्या भिडे वाड्यात सुरू झाली होती, तो वाडा आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने महानगरपालिकेने जमीनदोस्त केला आहे. गेल्या महिन्यात सर्व भाडेकरूंची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच भिडे वाडा महापालिकेला ताब्यात देण्याचा निर्णय दिला. त्यानुसार मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात पुणे महानगरपालिकेने ऐतिहासिक भिडे वाड्याचा ताबा घेतला. मोठ्या पोलिस बंदोबस्तात मध्यरात्री ही कामगिरी यशस्वी केली. आता या जागी लवकरच राष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारलं जाणार आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा पुणे शहरातील बुधवार पेठ येथील भिडे वाड्यामध्ये सुरू केली होती. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचे काम 2006 पासून रखडले आहे. भिडे वाड्याची मालकी एका सहकारी बँकेकडे आली होती. या बँकेच्या चोवीस भाडेकरूंनी या प्रकरणी पालिकेविरोधात खटला दाखल केला होता. उच्च न्यायालयात 80 वेळा सुनावणी होऊन पुणे महापालिकेच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला.