पुणे : शहर आणि परिसरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नुकतीच कोंढवा परिसरातील एका गोदामाला मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीची दुसरी घटना बाणेर परिसरातील एका उपहागृहातील भटारखान्याजवळ घडली. भटारखान्याला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली. भटारखान्यात तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या कामगाराची सुखरुप सुटका करण्यात आली. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. यामुळे मोठे नुकसान त्याचप्रमाणे जिवीतहानी टळण्यास मदत झाली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कोंढवा भागातील एक्सलंट पॅकेजिंग गोदामात मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करुन जवानांनी आग आटोक्यात आणली. त्याचवेळी गोदामात कोणी अडकले नसल्याची खात्री देखील जवानांनी केली.
बाणेर भागातील मोदी स्क्वेअर इमारतीत क्लाउड नाईन हॉटेल आहे. उपहारगृहातील भटारखान्यात आग लागली. आग लागल्याची महिती मिळताच अग्निशमन दलाच्या औंध केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. या वेळी आग लागलेल्या इमारतीत एक कामगार असल्याची माहिती जवानांना मिळाली. त्याअनुषंगाने शोध घेत जवानांनी कामगाराचीही सुखरुप सुटका केली. जवानांनी तातडीने मदत केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.