पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) कार्यालयाबाहेर उपोषणाला बसलेल्या एका विद्यार्थाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, पोलिस आणि विद्यार्थ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील अडीच वर्षे अधिछात्रवृत्ती मिळाली नाही.
त्यामुळे या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा लढा सुरू आहे. मात्र, या आंदोलनाचा कोणताही फायदा संशोधक विद्यार्थ्यांना झाला नाही किंवा याबाबत कोणत्याही प्रकारची दखल शासनाने घेतली नाही, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी करत आहेत. .
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बार्टीच्या कार्यालयासमोर बार्टी संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने ५ ऑगस्ट पासून आमरण उपोषणाला करत आहेत. या उपोषणादरम्यान २०२२ च्या एका संशोधक विद्यार्थ्याने १०० टक्के अधिछात्रवृत्ती आमचा हक्क आहे, अशा आशयाच्या घोषणा देत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. हा विद्यार्थी गरीब कुटुंबातील असून मित्रांकडून दीड लाखांचे कर्ज काढून पीएच. डी.चे शिक्षण घेत आहे.
अधिछात्रवृत्तीसाठी मागील अडीच वर्षांपासून वाट बघावी लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच त्यांना मानसिक तणावातून जावं लागत आहे. २५ जुलै २०२४ रोजी एक निर्णय प्रसिद्ध करून शासनाने बार्टी, सारथी तसेच महाज्योती या तीन संस्थेच्या विद्यार्थ्यांना ५० टक्केच अधिछात्रवृत्ती देण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, कृती समितीने सामाजिक न्याय विभागाच्या मुख्य सचिवासोबत बैठकीची मागणी केली आहे. उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बैठकी संदर्भात निर्णय न आल्यास अनेक विद्यार्थी असाच प्रयत्न करतील, असं अधिछात्रवृत्ती विभाग प्रमुख अनिल कारंडे यांना सांगितले.