Baramati News : बारामती : जगात भाऊ आणि बहिणीचे नाते हे सर्वात पवित्र मानले जाते. बहीण-भावाच्या नात्यावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक कथा आपण आजवर कथा-कादंबऱ्या, नाटिका, चित्रपटाच्या माध्यमातून वाचल्या-ऐकल्या अन् पाहिल्याही आहेत. अशीच बहिण-भावाच्या नातेसंबंधातील पैलू उलगडणारी एक प्रेरणादायी गोष्ट बारामती तालुक्यात घडली आहे. स्वतःच्या भावाचे आयुष्य वाढवण्यासाठी बहिणीने कोणताही विचार न करता किडनीचे दान दिले आहे. रक्षाबंधनाचा सण येण्यापूर्वीच बहीण भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा हा ह्रद्य सोहळा पाहून नातेवाईक देखील गहिवरले.
गडदरवाडी येथे राहणाऱ्या भावंडांची कहाणी
आज संपत्तीच्या हव्यासापोटी भावंडांमध्ये अंतर पडल्याच्या अनेक घटना घडल्याचे आपण पाहतो. मात्र, जीवाला जीव देणारी अशी भावंडं लाभणं हे देखील भाग्याचंच असतं, याचा प्रत्यय यानिमित्ताने आला आहे. सुभाष जगन्नाथ गडदरे आणि वैजयंता वलेकर अशी या भावंडांची नावे आहेत. (Baramati News) अवयवदान किंवा किडनीदानाविषयी आजही समाजात कितीतरी गैरसमज आढळतात. या पार्श्वभूमीवर या बहिणीच्या धाडसाचे कौतुक होत आहे.
बारामती तालुक्यातील गडदरवाडी येथे राहणाऱ्या या भावंडांची ही कहाणी आहे. सुभाष गडदरे हे सोमेश्वर साखर कारखान्यात स्वीच ऑपरेटर म्हणून काम करतात. त्यांना किडनीचा त्रास होता. २०२१ पासून हा त्रास खूप वाढला. परिणामी रक्तदाबाचा त्रास होऊ लागला. (Baramati News) आयुर्वेदिक उपचारांनंतरही फरक पडला नाही. अखेर डायलीसिस करण्याचा निर्णय झाला. सुभाष गडदरे हेच घरातील कर्ती व्यक्ती असल्यामुळे सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्यामुळे सुभाष यांची किडनी बदलण्याचा निर्णय कुटुंबियांकडून घेण्यात आला.
किडनी प्रत्यारोपणासाठी कुटुंबातील पाच जणांच्या किडनी तपासण्यात आल्या. परंतु किडनी मिळतीजुळती नसल्याचे कळले. सुभाष यांचे काका बापूराव गडदरे, पत्नी संगीता गडदरे व बहिण वैजयंता यांच्या किडनीची देखील तपासणी करण्यात आली. दरम्यान, वैजयंता यांची किडनी सुभाष यांच्या किडनीशी मिळतीजुळती असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, वैजयंता यांनी कोणताही विचार न करता, किडनी दान करण्याची तयारी दाखवली. वैजयंता यांना त्यांचे पती दादासाहेब, मुले व सासू-सासरे यांचाही भक्कम पाठिंबा मिळाला. सुभाष यांनी दीड वर्ष हा आजार अंगावर काढला होता. (Baramati News) मात्र, बहिणीच्या तयारीमुळे त्यांनाही आत्मविश्वास वाटला. पुण्यातील खासगी रूग्णालयात डॉ. सूर्यभान भालेराव व डॉ. तरूण जलोका यांनी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया केली.
या वेळी सुभाष गडदरे यांनी बहिणीबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. माझ्या लहान बहिणीने मोठे मन दाखविले. आपली किडनी भावाला देण्यासाठी योग्य आहे, हे समजल्यावर आढेवेढे न घेता, तत्काळ किडनी दानाचा निर्णय घेतला. (Baramati News) आज मी खऱ्या अर्थाने धन्य झालो… मला अशी बहिण लाभली. मला तिचा अभिमान वाटतो. सध्या माझी प्रकृती उत्तम आहे. माझी किडनी उत्तम कार्य करत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati News : बारामतीतील सरकारी कार्यालये पुण्यापेक्षा चांगली… काय म्हणाले रवींद्र धंगेकर?