Baramati News : बारामती : असं म्हणतात की एका आईने मुलासाठी केलेल्या त्यागांची तुलना कशाशीच करता येत नाही. कारण आई ही आई असते… आपल्या मुलांच्या रक्षणासाठी ती स्वतःच्या प्राणांची बाजी देखील लावू शकते. बारामती तालुक्यातील जळोची या गावामध्ये नुकताच याचा प्रत्यय आला. जळोचीतील हनुमंत भाऊ सूळ (वय २७) यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. किडनीदाता शोधण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. मात्र, सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर मुलाला नवे जीवन देण्यासाठी त्याची आई खंबीरपणे उभी राहिली. स्वतःची किडनी मुलाला देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हनुमंत यांच्यावरील किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीया यशस्वीरित्या पाप पडली आहे. आई-मुलाच्या या अनोख्या भावबंधाचे परिसरात कौतुक होत आहे.
अनोख्या भावबंधाचे जळोची परिसरात कौतुक
जळोची येथील हनुमंत भाऊ सूळ यांच्या किडनी निकामी झाल्या होत्या. त्यांना प्रत्यारोपणाची निकड होती. प्रयत्न करुनही त्यांना योग्य दाता मिळत नव्हता. हनुमंत यांच्या वडिलांचे निधन झालेले तर त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे संकट सूळ कुटुंबावर होते. (Baramati News) या परिस्थितीला सामोरे जावून, आत्मविश्वासाने मार्ग काढण्याचे आव्हाने आई शालन यांच्यापुढे होते. अखेर शालन यांनी कंबर कसली. परिस्थितीला धाडसाने सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या जीवासाठी शालन सूळ यांनी स्वतःचीच किडनी देण्याचा निर्णय पक्का केला.
कोईमतूर येथील एका रुग्णालयात प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. डाॅक्टरांच्या प्रयत्नाने ही शस्त्रक्रीया यशस्वी झाली व हनुमंत सूळ याला आईमुळेच नवीन जीवन मिळाले. (Baramati News) अविनाश सूळ यांनी जळोचीमधील सामाजिक कार्यकर्ते अॅड. अमोल सातकर यांच्या मदतीने कोईमतूरला जात पुढील प्रक्रीया पार पाडली. शस्त्रक्रीयेसाठी सुमारे १५ लाख रुपये खर्च आला. या कुटुंबाला सध्या आर्थिक मदतीची गरज आहे.