पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याची घटना समोर आली आहे. आज सोमवारी (दि. १३ मे) सकाळपासून सीसीटीव्ही बंद आहेत, यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे लक्ष्मीकांत खाबीया यांनी यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्याकडून या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सकाळपासून सीसीटीव्ही फुटेज बंद आहेत, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत? हे सुद्धा कळणं फार गरजेचे आहे ‘असं लक्ष्मीकांत खाबीया यांनी म्हटलं आहे. यावर आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकार कविती द्विवेदी म्हणाल्या की, इलेक्ट्रिशियन काम करत असल्याने एका सीसीटीव्हीची वायर निघाली होती. मात्र, संबंधित वेळेतील छायाचित्रीकरण हे उपलब्ध असून दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती द्विवेदी यांनी दिली.
कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान झालेली मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असून इलेक्ट्रेशीयन काम करत असताना त्याने एक वायर काढलेली असल्याने दूरचित्रवाणीच्या पडद्यावर चित्रिकरण काही वेळ दिसत नव्हते. मात्र याबाबत तातडीने चौकशी करून संबंधित यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे, असं कविती द्विवेदी म्हणाल्या.