पुणे: लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात आता जवळपास सर्वच ठिकाणी उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यानंतर उमेदवारांनी आपला प्रचार सुरु केला आहे. परंतु, प्रचार करत असताना उमेदवारांना वेगवेगळे अनुभव येत आहे. हा मतदार जागृत झाल्याचा परिणाम आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात त्यांच्या मतदार संघात बॅनर लागले आहेत. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात लागलेल्या बॅनरवरून अमोल कोल्हे यांना काही प्रश्न विचारण्यात आले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघ हा चर्चेत आहे. महायुतीकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सुरूवात केली आहे. मात्र गेल्या पाच वर्षांच्या काळात अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकले नाहीत, अन् आता प्रचारासाठी मात्र मतदारसंघात फिरत आहेत, अशी नाराजी मतदारांमध्ये दिसत आहे.
खासदार झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांचा मतदारांमध्ये पाहिजे तेवढा जनसंपर्क राहिलेला नाही. अमोल कोल्हे यांनी नुकताच आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात प्रचार दौरा केला. या वेळी परिसरात अमोल कोल्हे यांच्या विरोधात लागलेल्या पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनरवर विद्यमान खासदार साहेब गेले पाच वर्ष तुम्ही कुठे होता ? कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही मतदारसंघांमध्ये का नव्हता? पाच वर्ष मतदारसंघात नाही पण प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा भेटला ? असे तीन नेमके आणि मुद्द्याचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघातील आंबेगावमध्ये लागलेल्या या बॅनरची चर्चा सर्वत्र आहे.
दरम्यान माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली आहे. आम्ही शरद पवारांना विसरु शकत नाही. दिलीप वळसे पाटलांसह मला आजही शरद पवारांबद्दल आदर असल्याची भावना आढळराव पाटलांनी व्यक्त केली. मात्र अमोल कोल्हे हे फक्त शरद पवारांचे नाव घेऊनच प्रचार करत आहेत. शरद पवार यांचे नाव सोडून कोल्हेंकडे दुसरं भांडवलच नाही. शरद पवारांसोबत निष्ठा ठेवून उभा आहे, असे सांगत कोल्हे मतं मागत आहे. परंतु, आता त्यांच्या नावाने मत मागण्याचे तुमचे दिवस गेले आहेत, अशी टीका आढळराव यांनी कोल्हेंवर केली आहे.