लोणी काळभोर, (पुणे) : जागतिक महिला दिनानिमित्त बँक ऑफ महाराष्ट्र पुणे पुर्व अंचल कार्यालय व ग्रामीण महिला व बालक विकास मंडळ यांच्याव्दारे महाबँक महिला सशक्तीकरण महोत्सव अंतर्गत बचत गटांसाठी कर्ज वितरण व आर्थिक साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील गुलमोहर लॉन्स येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात बँक ऑफ महाराष्ट्र पुणे पुर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत २५७ बचत गटांना १२ कोटी ३२ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले. तसेच या महोत्सव अंतर्गत ग्रामीण ‘भागातील जवळपास ३ हजार ८४ कुटुंबाना या अंतर्गत होणाऱ्या कर्ज पुरवठयाचा लाभ होणार आहे. या शिबीरात ९५० पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला होता.
बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक आशिष पांडे यांनी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी गुंतवणूक करून प्रगतीला गती कशी मिळते, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महिलांना त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कर्जाचा कार्यक्षम वापर, डिजीटल व्यवहारांसंदर्भात काळजी घेऊन सतर्क रहाण्याचे आवाहन केले.
पुणे पूर्व अंचल व्यवस्थापक डॉ. जावेद क्यू मोहनवी यांनी महिलांना बचत गटामार्फत महिलांनी स्वतः उद्योजक कसे बनता येईल, यावर मार्गदर्शन केले. तसेच नियमित कर्ज परतफेड व व्यवसायात उत्तम काम करणाऱ्या बचत गटांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. कर्ज वितरणाबरोबरच आर्थिक साक्षरतेसंदर्भात बँकेच्या विविध अधिकाऱ्यांनी महिलांना लोकोपयोगी सामाजिक सुरक्षा योजना सुरक्षाविमा, जीवन विमा, अटल पेन्शन, कृषी योजना व लहान मोठ्या व्यवसायासाठीच्या विविध कर्ज योजनांची व वेळेवर कर्ज परतफेडीचे फायदे यावर विस्तृत माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते २५७ बचत गटांना १२ कोटी ३२ लाखांचे कर्ज मंजुरीच्या पत्रांचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, ग्रामीण महिला व बालक विकास मंडळाचे सचिव संतोष गदादे यांनी संस्थेमार्फत बचत गटांना देण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम व बचत गटांनी बनविलेल्या मालाची विक्री करण्यासाठी विविध माध्यमांची माहिती दिली.