उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन ग्रामीण पोलिसांनी मागील काही दिवसांपासून अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे हत्यार उपसले आहे. विशेषत: अवैधरित्या देशी व गावठी दारु, मटका अड्ड्यांवर पोलिसांकडून छापेमारी सुरू असून, गुन्हे दाखल केले जात आहेत. मागील दोन दिवसांत पोलिसांनी परिसरातील अवैध देशी-विदेशी दारू, मटका धंद्यांवर कारवाई करून सुमारे ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत, गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत “पुणे प्राईम न्यूज”ने उरुळी कांचनसह परिसर अवैध धंद्यांच्या विळख्यात’ याबाबतचे वृत्त सोमवारी (ता. १९) प्रकाशित केले होते. त्यानंतर कारवाईला वेग आला.
उरुळी कांचन पोलिसांनी कार्यक्षेत्रातील मटका, जुगार, दारू विक्री या अवैध धंद्यावर अचानक धाडी टाकून ५ ठिकाणी धडक कारवाई करीत ६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या आदेशाने कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी अवैध धंद्यांवर धाडसत्र मंगळवारी (ता. २०) सुरू केले आहे.
या कारवाईत उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेठ, नायगाव, उरुळी कांचन परिसरात अवैध गावठी हातभट्टीची दारू विक्री करणारी ठिकाणे व हॉटेलच्या विविध ठिकाणांवर पायपीट करून, त्यांचा शोध घेवून छापे टाकण्यात आले आहेत, अशी माहिती उरुळी कांचनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.
अवैधरित्या मटका चालविल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी रवी अवचट व अक्षय त्रिंबक शिरोळे (वय २७, दोघेही रा. नायगाव, ता. हवेली), दत्ता विठ्ठल कदम (वय ५५, रा. पिराचा मळा, हरीजीवन हॉस्पिटलच्या पाठीमागे, उरूळी कांचन, ता. हवेली) तर बेकायदा देशी, विदेशी दारू विक्री प्रकरणी विठ्ठल दत्तात्रय घाडगे (वय ३०, रा. गिरमेवस्ती, चौधरी माथा, उरूळी कांचन), अशोक नामदेव चौधरी (वय ४३, रा. पेठ, ता. हवेली) व बेबी नारायण चौधरी (वय ३६, रा. उरूळी कांचन, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. २०) नायगाव ग्रामपंचायत हद्दीतील दोस्ती हॉटेलच्या बाजूला रवि अवचट, अक्षय शिरोळे व उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील शैलेजा हॉटेलच्या आडोशाला दत्ता कदम हा जुगाराची साधने जवळ बाळगून, त्याच्या ओळखीच्या लोकांना जुगार खेळ खेळत व खेळवीत असताना आढळला. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरमे वस्ती परिसरात गुरु हॉटेलच्या आडोशाला विठ्ठल घाडगे, पेठ येथे हॉटेल सूरज वे शेजारी अशोक चौधरी व उरुळी कांचन येथील हॉटेल सोनाईचे शेजारी बेबी चौधरी हे तिघेजण बिगर परवाना अवैद्य देशी विदेशी दारू विक्री करताना आढळून आल्याने त्यांच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, उरुळी कांचन पोलिसांनी त्यांच्याकडून साहित्य व ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे उरुळी कांचन परिसरात बऱ्याच कालावधीपासून अवैध धंदे सुरू होते, हे स्पष्ट होते. पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी धडाडीने सुरू केलेल्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून, पुढील काळात देखील अशी कारवाई सुरू रहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.